Saturday, 7 April 2018

संभाजी: एक वादळ


It is not heroes that make history, but history that makes heroes.
नायक इतिहास घडवत नाहीत, तर इतिहास नायक घडवतो।
 - जोसेफ स्टॅलिन


तुम्ही म्हणाल, हे कसले विचित्र कथन घेऊन लेखाची सुरुवात? परंतु संभाजी महाराजांना इतिहास शाप होऊन  त्यांना कित्येक वर्षे "बिघडवत" आलाय. ह्या महानायकाचा त्यानी फक्त खलनायक करुन सोडला! अनेक इतिहासाच्या साधनांनी त्यांच्या योगदानाला न्यायच दिला नाही, उलट त्यांची केवळ बदनामीच केली. बऱ्याच नव्या इतिहासकारांनी केलेल्या अलिकडच्या संशोधनांनी बऱ्याचशा अंशी संभाजी राजांवरील कलंक पुसले आहेत.

माझा हा लेख म्हणजे पण खऱ्या संभाजींवर प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण संभाजीराजेंचा जीवन प्रवास, प्रशासकीय, धार्मिक धोरणे, त्यांचे सामाजिक व साहित्यिक योगदान या सर्व बाबी समजून घेऊ. कृपया मोकळ्या मनाने कमेंट्स मधे चर्चा करा.
For English version click here.

बालपण


संभाजी महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी यांचे प्रिय पुत्र होत. त्यांना लाडाने शंभुराजे म्हणत. ते स्वराज्याचे दूसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुण्याच्या पुरंदर किल्यावर झाला. त्यांची आई सईबाई, शिवाजी राजांच्या प्रथम पत्नी फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. बाळ शंभू केवळ दोन वर्षांचे असताना सईबाईंचा मृत्यू झाला. शंभुराजे जिजाबाईंच्या देखरेखीखाली मोठे झाले.

छोट्या शंभुराजांचे लग्न पिलाजीराव शिर्के यांची मुलगी जिवुबाई (लग्नानंतर येसुबाई ) हिच्याशी झाले. हा एक राजकीय विवाह होता. पिलाजीराव हे एका देशमुखाच्या (शिर्के ) सेवेत होते. देशमुखाच्या पराभवानंतर ते शिवाजी महाराजांच्या सेवेत आले. या विवाहामुळे किनारपट्टीच्या परिसरात मराठ्यांची ताकत वाढली. तसेच यामुळे मराठ्यांचे  नौदलही अधिक बळकट झाले.

संभाजीराजे फार सुशिक्षित व सुसंस्कृत होते. भोसले घराण्याचे पारंपारिक शिक्षक असलेल्या केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजींच्या शिक्षणाचे काम पाहिले. त्या दोघांनी केवळ अक्षरांचीच शिकवण दिली नाही तर त्यांना रामायण आणि महाभारत या पारंपरिक भारतीय पुराणांचा देखील अभ्यास करविला. पुढे संभाजींना मूलभूत शिक्षण जसे की घोडेस्वारी, लष्करी मोहिम, गनिमी कावा इत्यादी प्रदान करण्यात आले. शंभुराजे आठ वर्षांचे असताना योग्य शिक्षणामुळे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या सतर्क होते.

पुरंदरचा तह आणि आगरा भेट


इ.स. १६६५ च्या सुमारास औरंगजेबने स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग या राजपूत सरदारास पाठविले. शिवाजी महाराजांना युद्ध व हानी टाळण्यासाठी मिर्झा राजाशी राजकीय तह करावा लागला. ह्या करारानुसार त्यांनी २३ किल्ले आणि ४ लाख होन (त्या काळातील चलन) मुगलांना देणे मान्य केले. संभाजी महाराज संधीच्या सर्व किल्ल्यांचा ताबा मिर्जास मिळेपर्यंत ओलिस राहिले. संभाजीराजांना राजकारणात प्रवेश करावा लागला आणि त्यांनी काही जबाबदाऱ्याही पार पाडल्या. त्या वेळी संभाजी राजे केवळ ९ वर्षांचे होते.

तहानुसार, शिवाजी व संभाजी महाराजांना पातशहाच्या ५० व्या वाढदिवसादिवशी त्याच्या भेटीसाठी आगरा येथे जावे लागले (१६६६). औरंगजेबाने शिवाजी महाराजांना रांगेत इतर सरदारांसमवेत उभे करुन त्यांचा अपमान केला. यातून शिवाजीराजे भयंकर संतापले आणि त्यांनी दरबार सोडला. औरंगजेबाने महाराजांना कैदेत ठेवले. त्या काळात संभाजीराजांना दररोज औरंगजेबास कुर्निश करावयास जावे लागे. ही जबाबदारीही छोट्याश्या शंभूबाळाने मोठ्या शिताफीने पार पाडली. शिवाजीराजे आणि संभाजीराजे तिथून नाटकीय पद्धतीने निसटले. संभाजी महाराज मथुरा येथील ब्राम्हण कुटुंबासह काही महिने मागे राहिले आणि शिवाजी महाराज स्वराज्यात सुखरूप पोहोचले. काही महिन्यांनी प्रकरण शांत झाल्यावर संभाजी महाराज स्वराज्यात आले. त्या काळात संभाजींनी ब्रज भाषेचे ज्ञानही प्राप्त केले.


बगावत


मंत्रिमंडळातील काही लोक शेवटपर्यंत ईमानदार राहिले नाहीत. सुरवनीस अण्णाजी दत्तो, पेशवे मोरोपंत पिंगळे, राहूजी सोमनाथ हे त्यांपैकी काही होत. हिरोजी फर्ज़न्द यांनी ही हरामखोरी केली. हे सर्व आपल्या फायद्याकरता आपल्या पदांचा गैरवापर करु लागले. संभाजी राजांनी नेहमीच अशा कारणांखातर त्यांची कनउघाडणी केली. संभाजी राजांच्या कडक शिस्तीला हे लोक कंटाळले आणि त्यांनी संभाजी राजांना बदनाम करण्यास सुरुवात केली. संभाजी राजांना बदनाम करण्याची एकही संधी ते सोडत नसत.

या सततच्या तक्रारी आणि तणाव यामुळे शिवाजी आणि संभाजी राजांमधे दुरावा निर्माण झाला. सततच्या मानहानीस त्रासून त्यांनी मुघल सरदार दिलेर खान याच्याशी संध साधला. जरी दिलेर खान पूर्वी संभाजी राजांना आपल्याकडे या अश्या विनवण्या करे, परंतु त्याचा मनसूबा चांगला नव्हता. जेंव्हा त्याच्या लक्षात आले की संभाजी राजे स्वराज्या विरुद्ध लढावयास नापसंती दाखवत आहेत त्याने संभाजी राजांना कैद करुन दिल्लीला पाठवायचा बेत आखला. शंभू राजांना आपली चूक समजली आणि शिवाजी राजांच्या मदतीने संभाजी राजे सुखरूप परत आले.
*काही इतिहासकारांच्या मते हे एक शिवाजी राजांद्वारा पुरस्कृत नाट्य होते. शिवाजी राजांनी दक्षिण मोहिम नुकतीच आटोपली होती. सैन्याला आणि जनावरांना आरामाची गरज होती. संभाजी राजांचे मुघलांस जाऊन मिळाल्याचे नाट्य दिलेर खानास कुठलेही आक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी होते. शिवाजी राजांचा इतिहास वाचला तर अशा अनेक युक्त्या त्यांनी गनीमांस गाफिल ठेवण्याकरता वापरल्याचे दिसून येते.

राजदंड


३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले. अण्णाजी आणि इतरांनी षडयंत्र करून पन्हाळा किल्ल्यात संभाजींना पकडण्याचा प्रयत्न केला. ते छोट्या राजारामाला  गादीवर बसवू आणि मराठा साम्राज्यावर ताबा मिळवू इच्छित होते. राजारामांच्या आई सोयराबाईही या योजनेत सहभागी झाल्या.

मराठ्यांच्या सैन्याचे सरसेनापती, सोयराबाईंचे सख्खे भाऊ हंबिरराव मोहिते यांना संभाजींना तुरुंगात पाठवण्याकरता पाचरण करण्यात आले. परंतु त्यांनी संभाजीराजांना सिंहासनाचा योग्य वारस म्हणून पाठिंबा दिला. संभाजी राजांनी लागलीच स्वराज्याची सुत्रे हाती घेतली. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. हंबिररावांच्या समर्थनामुळेच हे शक्य झाले. संभाजींनी षडयंत्रात सामील असलेल्या सर्वांना माफी दिली व मोरोपंत पिंगळे यांना पेशवे म्हणून पुन्हा नियुक्त केले. मोरोपंतांच्या मृत्यूनंतर संभाजींनी त्याचा पुत्र निळोपंत यांची पेशवा म्हणून नियुक्ती केली व त्यांचा पक्ष बळकट झाला.

स्वराज्याचे दूसरे छत्रपती संभाजी महाराज

प्रमुख लढाया

 

बुरहानपुरावर हमला


मुघल सरदार बहादुरखान कोकालताश बुरहानपुर चा प्रमुख होता. तो बुरहानपुर सोडून एका लग्नासाठी निघून गेला होता. लग्नामधे दिखावा करण्याकरता बहुतांश सैन्य तो सोबत घेऊन गेला. संभाजींनी या संधीचा उपयोग करुन घेतला. मराठ्यांनी शिवाजी महाराजांनी दोनदा लूटलेल्या सूरतवर संभाजी आक्रमण करणार असल्याची अफवा पसरवून मुघलांना फसविले. पण संभाजी महाराजांनी हंबररावासोबत ब्रहहनपूरवर आपल्या राज्यारोहणाच्या पंधरवड्यात हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघल बुरहानपुर वाचवू शकले नाहीत.

मराठ्यांनी बुरहानपुरमधील सर्व धन लुटले(सुमारे २० लाख रुपये). बुरहानपूरचे लोक, विशेषत: महिला आणि लहान मुले यांना इजा पोहोचली नाही.

औरंग़ज़ेबाचे सावट


औरंगजेबाचा चौथा मुलगा, अकबर याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले आणि तो महाराष्ट्रात पळून आला. तो औरंगजेबास पायउतार करून स्वतः सम्राट होण्याची महत्वाकांक्षा बाळगत होता. अकबरला माहीत होते की हिंदुस्थानात केवळ एक राजाच होता त्याला औरंगजेबच्या विरूद्ध मदत करण्यास सक्षम होता, आणि तो म्हणजे संभाजी. राजकारणाचा भाग म्हणून संभाजींनी अकबरला आश्रय दिला. संभाजी महाराजांचे अकबरला आश्रय देणे औरंगजेबास खूप झोंबले.

औरंगज़ेब

औरंगजेब १६८२ च्या सुरुवातीस सुमारे पाच लाख सैन्यांसह महाराष्ट्रावर चालून आला, जे त्यावेळी कदाचित जगातील सर्वात मोठे सैन्य होते. औरंगजेबचे सैन्य मराठा सैन्याच्या जवळपास दहापट इतके अधिक होते.

मुघल सरदारांनी नाशिकजवळच्या छोट्याश्या रामशेज किल्ल्यावर हल्ला करुन आक्रमणास सुरूवात केली.

दरम्यान अण्णाजी, मोरोपंत, हिरोजी फरजंद आणि सोयराबाई यांनी संभाजींविरुद्धचे षडयंत्र चालूच ठेवले. त्यांनी संभाजींच्या अन्नात विष कालवले पण सुदैवाने हे सर्व उघडकीस आले. त्यांनी संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी संभाजी राजांना आश्रित आलेल्या अकबराची मदत घेण्याचा प्रयत्न केला. अकबरने हे सर्व संभाजी राजांसमोर उघड केले. संभाजींनी या मंत्र्यांना अटक केली आणि त्यांना स्वराज्यद्रोहाच्या गुन्ह्याखाली हत्तीच्या पायी दिले. सोयराबाईंना तुरुंगात ठेवण्यात आले. एक वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला.

रामशेज ची लढाई


मुघल सैन्याने रामशेज किल्ल्यापासून मराठा साम्राज्यावर हल्ला चढवला. नाशिकजवळ रामशेज हा छोटासा किल्ला आहे. किल्ल्याला नैसर्गिक सुरक्षा प्राप्त आहे. किल्ल्यात सुमारे ७०० मराठा सैन्य होते. मुघल सरदारांनी दावा केला की ते काही तासांच्या आत रामशेज किल्ला जिंकतील.

मराठ्यांनी निकराचा लढा दिला आणि मुगलांचा किल्ल्यात प्रवेश होऊ दिला नाही. संभाजीराजे आणि त्यांच्या इतर सैन्यांच्या तुकड्यांनी रामशेजच्या भोवतालच्या मुगल सैन्यावर हल्ले केले. औरंगजेबने हजारो सैन्य पाठविले आणि सरदार ही दोन वेळा बदलून बघितले, पण किल्ल्याची लढाई कित्येक वर्षांपर्यंत चालली. नवीन सरदार सूर्यजी जेधे यांना मुगलांनी लाच दिल्यानंतरच ते किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकले. हा किल्ला घेण्यासाठी मुघलांना तब्बल साडे सहा वर्षे लागली.

जंजिरा


जंजिरा बेट सिद्दींच्या नियंत्रणाखाली होते. अरबी समुद्रात जंजिरा अतिशय महत्वाचा आणि अभेद्य किल्ला होता. आणि त्याच्या सर्व बाजूंनी तोफांचा गराडा होता. हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे ठिकाण होते कारण खलाशी  लोकांवर लक्ष ठेवता येई व किल्ल्याकडून जाण्यासाठी मोठी रक्कम व्यापाऱ्यांना मोजावी लागे. मराठ्यांनी पूर्वी अनेकदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरला. सिद्दी लोक कोकणच्या परिसरात लुटीही माजवत, त्यामुळे तिथली रयत त्रस्त होती. ही एक मोठी समस्या होती. सिद्दी लोकाना धडा शिकवणे गरजेचे होते. संभाजींनी जंजिरा काबीज करण्याची योजना आखली.




संभाजींनी कोंडाजी फ़र्ज़न्द यांच्या नेतृत्वाखाली जंजिरा किल्ल्यात हेर पेरले व त्यांनी जंजिऱ्यात ठिकठिकाणी दारू भरली. मोठा स्फोट होऊन जंजीरा उडण्याची शंभुराजे वाट पाहत होते. दुर्दैवाने सिद्दीस या योजनेचा सुगावा लागला आणि सर्व हेर पकडले गेले. एक सोडून इतर सर्व मारले गेले.

यानंतर संभाजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व बाजूंनी किल्ल्यावर हल्ला केला. सिद्दींनी त्यांच्या तोफांनी जहाजांतून मोठा प्रतिकार केला. त्यानंतर संभाजीराजांनी समुद्रात किना-यापासून किल्ल्यापर्यंत दगडी पूल बांधनेस सुरुवात केली. बांधकाम अत्यंत धोकादायक, कठीण आणि खर्चिक होते. पूल सुमारे अर्धा बांधला गेला असताना बातमी आली की औरंगजेबाने स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी रायगडावर सैन्य पाठवले होते. मुघल सैन्याच्या प्रतिकारासाठी संभाजींना जंजिरा मोहिम अर्धवट सोडावी लागली. त्यानंतर सिद्दींनी मराठ्यांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही.

अर्ध्या बांधलेल्या पुलाचे अवशेष अजूनही जंजीरा येथे पहायला मिळतात.

गोव्यावर हमला


मुगलांना पोर्तुगीजांद्वारे शस्त्र पुरवठा होण्याची शक्यता होती आणि गोव्यातील पोर्तुगीज बंदरावर मुगल जहाजे उतरायला परवानगी दिली जात होती. पोर्तुगीज घमंडी बनले होते आणि मराठ्यांवरील मुगल हल्ल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत होते. पोर्तुगीज अर्ध्या मराठा प्रदेश घेण्याचे स्वप्न पाहत होते.

संभाजींनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहिम हाती घेतली. मराठ्यांनी गोव्यावर जोरदार हल्ला चढविला आणि पोर्तुगीज प्रांत आणि किल्ले जिंकणे सुरू केले. पोर्तुगीज मराठ्यांपुढे टिकू शकले नाहीत. मराठ्यांनी गोवा प्रदेशाचा तीन चतुर्थांश भाग ताब्यात घेतला. गोव्यातील सर्वसामान्य लोक बंडखोर बनले. खूप वर्षांपासून होणाऱ्या पोर्तुगीज अत्याचाराचा, जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराचा त्यांना बदला घ्यायचा होता. त्यांनी पोर्तगीजांस मारहाण करण्यास सुरुवात केली. संभाजींनी गोव्यातील क्रोधित लोकांना नियंत्रणात आणले. मराठ्यांच्या जोरदार हमल्यामुळे पोर्तुगीजांच्या सर्व आशा संपल्या. खूप पत्रव्यवहार करून देखिल गरजेच्या वेळी फ्रांस वरुन ही त्यांना मदत आली नाही. पोर्तुगीज शासक काउंट दी अल्वेर(Count De Alver) आणि त्याच्या मंत्र्यांनी सेंट जेवियरचा (Saint Xavier) मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणून की काय, संभाजींना गोवातून निघून जावे लागले, कारण औरंगजेबचा पुत्र मुअज़्ज़म स्वराज्यावर सुमारे ४०,०००  सैनिकांसोबत चालून येत होता.

म्हैसूरची लढाई


मुघलांच्या मराठ्यांवरील संकटाचा फायदा घेत दक्षिणेतील चिक्क देवरायाने स्वराज्यात घुसखोरी सुरू केली. संभाजींनी आपला दूत चिक्क देवरायाकडे पाठविला. दूताचा मैसूर न्यायालयामध्ये अपमान करण्यात आला. या वेळी मात्र संभाजींनी म्हैसूरवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जिंजीच्या आपले सावत्र काका इकोजी राजे यांच्याकडूनही मदतीची मागणी केली.

चिक्क देवरायाने म्हैसूरच्या प्रदेशापर्यंत पोचण्यापूर्वीच मराठ्यांना थोपविण्याचा निर्णय घेतला. बाणांच्या प्रचंड माऱ्याने मराठा सैन्याचे स्वागत करण्यात आले. म्हैसूरच्या धनुर्धाऱ्यांनी लांब आणि धातूचे बाण मारले आणि मराठ्यांना जीवघेण्या जखमांनी घायाळ केले. संभाजीराजांना थोडा वेळ माघार घ्यावी लागली आणि त्यांनी जवळच तळ ठोकला.

त्यानंतर संभाजीराजांनी स्थानिक चर्मकारांना चमड़्याचे कपडे तयार करण्याचे आदेश दिले.उपलब्ध स्थानिक लाकडाचा वापर करुन मराठ्यांनी धनुष्य आणी बाण तयार केले. म्हैसूरच्या धनुर्धाऱ्यांनी मराठ्यांच्या तुलनेत जास्त मजबूत आणि उत्तम दर्जाचे धनुष्य आणि बाणांचा वापर केला. परंतु, त्यांचे बाण यावेळी तेल लावलेल्या चामड़ी पोषाखांवर व्यर्थ ठरले. त्यांच्या विरोधात, मराठ्यांनी बाणांच्या टोकांना कापड़ी बोळे लावून तेलात बुडवून आग लावून किल्ल्यावर मारा केला त्यांपैकी काही स्फोटकांच्या साठ्यावर मारले आणि किल्ल्यावर भयंकर स्फोट घडवून आणला. यामुळे म्हैसूरच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली.तिरुचिरापल्लीचा पाषाणकोट मराठ्यांच्या हाती आला. परिस्थिती ओळखून असलेल्या चिक्क देवरायाने तहाची बोलणी सुरु केली आणि मराठ्यांच्या अटींचे पालन करण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांची लष्करी बुद्धीमत्ता ह्या विजयामधे झळाळून निघाली.


त्रिचनापल्ली चा पाषाण कोट! संभाजी राजांनी हा किल्ला मोठ्या शिताफीने घेतला.


उत्तरार्ध


मुगल साम्राज्यावर हल्ला करून मुगल सैन्याला रोखण्यासाठी, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज व इंग्रज यांच्याशी शांती हवी म्हणून छत्रपती संभाजी यांनी शांतता करार केले. दोन प्रमुख मुघल आक्रमणे त्यांनी परतवून लावली. सिद्दी व चिक्कदेवराय यांना मुगलांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यापासून परावृत्त केले. औरंगजेबाने हे लांबलचक युद्ध संपुष्टात आणण्यासाठी घाताने संभाजी राजांना पकडण्याचा डाव आखला.


आदिलशाही आणि कुतुबशाही बुडाली


संभाजींनी विजापूरचा आदिलशहा आणि गोळकोंडयाचा कुतुबशहा यांच्याशी शांतता करार केला होता. मुघलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे गरजेचे होते. औरंगजेबाने प्रचंड सैन्याच्या मदतीने आदिलशहा व कुतुबशहा यांना पराभूत केले(१६८६ - १६८७), कारण ते संभाजींच्या विरोधात मुघलांना मदत करीत नव्हते. औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही साम्राज्यांतून दोन सरदार, मुकर्रब खान आणि सर्जाखान यांना आपल्या सेवेत घेतले.

घात आणि अपघात


१६८९ च्या सुरुवातीस पन्हाळ्यावरुन रायगडला छोटिशी तुकडी घेऊन जाताना संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचा मुक्काम पडला. महाराजांचा मेव्हणा गणोजी शिर्के याने वतनाच्या तुकड्याकरता हरामखोरी केली आणि औरंगजेबचा सेनापती मुकर्रब खान याला मदत केली.

शंभुराजे, त्यांचे परम मित्र कवी कलश आणि त्यांचे सैन्य सर्व बाजूंनी वेढले गेले. मराठ्यांनी 'हर हर महादेव' ची गर्जना केली आणि असंख्य मुघलांवर प्रतिकार केला. चुरशीच्या लढाईमधे मराठ्यांचे सर्व सैन्य मारले गेले. १  फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडण्यात आले.

जिथे संभाजी राजांना मारण्यात आले तिथले स्मारक, तुळापूर 
संभाजी व कवी कलाश यांना सुमारे ४० दिवस कैद करून ठेवले होते. या काळात औरंगजेबाने आपल्या सर्व किल्ल्यांची शरणागती पत्करून संभाजींना फितूर मुघल सेनापतींची सर्व नावे देण्यास सांगितले. या बदल्यात जीवनदान देण्याचा प्रस्ताव ठेवला. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भिक दिली नाही. सुमारे ४० दिवसांच्या कालखंडात संभाजी राजांना आणि कवी कलश यांना निर्घृणपणे छळले गेले. कवी कलशांच्या मृत्युनंतर काही दिवसांनी ११ मार्च १६८९ रोजी संभाजींचा शिरच्छेद केला गेला आणि शरीराचे तुकडे करुन भीमा नदीच्या काठावर टाकले. असे म्हटले जाते की वढू गावातील महार लोकांनी (जे तुळापूरपासून अर्धा किलोमीटरवर आहे) महाराजांचे हे तुकडे गोळा केले आणि संभाजींचे अंत्यसंस्कार पूर्ण केले.


शासन

 

राजमुद्रा



श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। 

अर्थ: शिव पुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील।

हा शिक्का संभाजी महाराज शासकीय पत्रे आणि आज्ञापत्रांमधे वापरत असत.

लोककल्याणकारी राजा


निसर्ग राज्याच्या विरोधात होता. दोन वर्षांपासून १६८७ - १६८८ मध्ये मोठा दुष्काळ पडला. अन्न आणि पाणी टंचाईमुळे राज्यात अडचणी होत्या. दुष्काळाच्या परिस्थितीचे उच्चाटन करण्याच्या धोरणाचे कठोर पालन करून संभाजी संभाजीराजे प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्यास सक्षम होते.

किल्ले, राजवाडे आणि सिंचन, धरणाची बांधकामे, संभाजी महाराजांच्या कला व स्थापत्यकला इत्यादि गोष्टी संभाजी राजांच्या प्रजेच्या काळजीचे द्योतक आहेत. ह्या सर्व गोष्टी त्यांच्या काळातील उपलब्ध पुराव्याच्या आधारावर तपासल्या जाऊ शकतात.

 

धार्मिक धोरण


संभाजी मुस्लिम विरोधी नव्हते. त्यांनी शिवाजी राजांची शांतताप्रिय मुस्लिमांस अभय देण्याचे धोरण पुढे कायम ठेवले. रामदास आणि तुकाराम यांच्याबरोबर त्यांचे मुस्लिम गुरुही (याकूबबाबा औलिया) होते.

शिवाजी महाराजांनी जबरदस्तीने धर्मांतरीत झालेल्या नेताजी पालकर यांना हिंदू धर्मात परत आणले. संभाजींनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला. प्रलोभन, जबरदस्ती आणि लबाडी यामुळे इतर धर्मांमध्ये रूपांतरित झालेल्या हिंदुना संभाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात घेतले.


स्त्रियांचा सन्मान


संभाजींनी नेहमीच स्त्रियांचा आदर केला आणि पुरुषांइतकेच समान मानले. त्यांनी आपल्या पत्नी येसुबाई यांना अनेक अधिकार दिले. त्या काळातील हे एक मोठे पाऊलच म्हणावे लागेल. येसुबाईंना स्वतःचा सही शिक्का आणि कट्यार असे अधिकारही होते.

साहित्यिक शंभुराजे 


संभाजींना मराठीव्यतिरिक्त संस्कृत, इंग्रजी आणि कन्नड या सारख्या अनेक भाषांची माहिती होती.

संभाजीराजे कवी मनाचे होते. त्यांनी लहान वयातच उत्कृष्ट काव्यरचना केली. त्यांपैकी काही पुस्तके संस्कृतमध्ये बुधभूषण, तर ब्रिज भाषेमध्ये नायिकाभेद, सातसतक, नखशिखा ही आहेत.

बुधभूषण ची मूळ प्रत

१६७६ - १६७८ च्या दरम्यान श्रीरंगपुर येथे असताना संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहिला असावा. पुस्तकाचे सुरुवतीचे काही श्लोक गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली आहेत. शंभुराजांनी हिंदू साहित्य जसे रामायण, महाभारत इ. वाचले असावेत, हा निष्कर्ष काढता येवू शकतो.


बुधभूषण मध्ये शिवाजी महाराजांची खालीलप्रमाणे प्रशंसा आहे:

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ :
कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥


संभाजी राजांनंतर


शंभू राजाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी मोगलांशी लढा सुरू ठेवला. राजारामास छत्रपती बनवण्यात आले. मराठा सैन्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यानंतर म्हाळोजी घोरपडे यांचे संगमेश्वर येथील चकमकीत निधन झाले. संभाजींच्या निधनानंतर काही दिवसांनी राजधानी रायगड पडला आणि संभाजीच्या पत्नी येसुबाई आणि शाहू यांना मुघलांनी कैद केले. राजाराम यांनी राजधानी दक्षिणेकडे जिंजीला हलवली. मराठ्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुगल सैन्याला सळो की पळो करुन सोडले.

संभाजी महाराजांनंतर औरंगजेबने मराठ्यांच्या विरुद्धची कठोर लढाई चालूच ठेवली. १८ वर्षे त्यांने संपूर्ण महाराष्ट्र आणि मैसूर आणि तामिळनाडू वगळता संपूर्ण भारत व्यापला होता तरीही तो मराठ्यांचा संपूर्ण प्रदेश हस्तगत करू शकला नाही आणि संपत्ती वाया घालवत राहिला. औरंगजेबाचा वयाच्या ९० व्या वर्षी औरंगाबादमध्ये मृत्यु झाला आणि अजूनही त्याचा मराठ्यांशी लढा चालूच होता. मुघलांना औरंग़ज़ेबानंतर चांगला उत्तराधिकारी मिळाला नाही आणि मुघल साम्राज्य खिळेखिळे झाले आणि नंतरच्या काळात ते मराठ्यांचे मांडलिक बनले.

ठेवा


औरंगजेबच्या ५ लाख सैन्याविरुद्ध संभाजी महाराजांनी सलग ९ वर्षे लढा दिला आणि अखेरीस स्वराज्यासाठी आपले मस्तक दिले, परंतु त्यांनी स्वराज्यातील एकही महत्त्वाचा किल्ला गमावला नाही आणि शरण गेले नाहीत. त्या काळात त्यांनी नवा स्वाभिमान व उत्साह लोकांमधे निर्माण केला आणि स्वराज्य बळकट केले. संभाजी राजांनी दिलेले आदर्श करारीपणा, स्वातंत्र्य, या तत्वांशी कायम राहून मराठ्यांनी मुघलांच्या प्रचंड सैन्याविरुद्ध लढा कायम ठेवला आणि औरंगजेबाचा दक्षिण दौरा फ़ोल ठरवला आणि त्याची कबर अखेर इथेच बनली.

संभाजी राजे आणि कवी कलश यांचे समाधी स्थळ

अलीकडील संशोधानपर्यन्त या महापुरुषास बऱ्याचशा खोट्या अरोपांमधे गुंडाळले होते. काही जूनी मराठी नाटके आणि गाथा संभाजींना अपमानास्पदच वागणूक दिली आहे. अशा आरोपांचे समर्थन करणारे काहीच सबळ पुरावे नाहीत. या "वॉर लाइक प्रिंस" विरुद्धचे हे दूसरे काही नसून खोटे आरोप आहेत.
*War like prince: पोर्तुगीज पत्रांमधे हा उल्लेख आढळतो.

अमेरिकन इतिहासकार स्टीवर्ट गॉर्डन(Steward Gordon) आपल्या पुस्तकात The Marathas 1600-1818 भर देतो:

During Sambhaji's reign we find no evidence to support notions made popular by Marathi drama and ballads that Sambhaji was constantly drunk or drugged or in his harem. Quite to the contrary there are extant administrative orders right upto the month of his execution.

संभाजी च्या संपूर्ण काळातील आम्हाला असा एकही पुरावा मिळाला नाही जो संभाजीस दारुड़ा आणि स्त्रिलंपट साबित करेल, जसे काही मराठी नाटकांमधे दाखवले गेले आहे. याउलट संभाजीच्या काळातील अगदी मृत्युपर्यंतच्या महिन्यातील खूप सारी राजकीय आज्ञापत्रे उपलब्ध आहेत.


संभाजी महाराज, त्यांचे संपूर्ण जीवन, त्यांचा संघर्ष, शौर्य आणि स्वराज्यासाठीचे बलिदान युगानयुगे आपल्याला प्रेरणा देत राहील. ह्या लोक कल्याणकारी राजास मानाचा मुजरा!

मार्कस सिसरो(Marcus Tullius Cicero) च्या ह्या कथनाने थांबतो:
Poor is the nation that has no heroes, but poorer still is the nation that having heroes, fails to remember and honor them.
ती राष्ट्रे दुर्दैवी आहेत ज्यांच्याकडे महापुरुष जन्मलेच नाहीत, परंतु ती राष्ट्रे अधिक दुर्भाग्यशाली म्हणावी लागतील जयांकडे महापुरुष होऊन गेले असूनही ती त्यांना विसरतात आणि त्यांचा सन्मान ठेवत नाहीत.

जय हिंद!


संदर्भ:


१. संभाजी - विश्वास पाटील.
२. The Marathas 1600-1818 - Stewart Gordon
३. Struggle and Sacrifice: A research paper by M. N. Karbhari 
४. संभाजी महाराजांचे साहित्य
. बुधभूषण


7 comments:

  1. Replies
    1. Thanks.
      शंभू राजांचा इतिहास मराठी माणसापर्यंत आणि जगभर पोहोचावा यात माझा खारी चा वाटा. थोड्या अधिक प्रमाणात का होईना तो सफल झाल्याचा अपार आनंद आहे.

      Delete
  2. खूप माहिती पुर्ण माहिती मिळाली अनभिज्ञ अशी थन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपणांस मजकूर उपयोगी वाटला याचा आनंद आहे.

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. धन्यवाद खरे संभाजी महाराज सगळ्यांसमोर आनन्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुन्ना येखदा धन्यवाद

    ReplyDelete
  5. All metal bikes & bikes - TITANIA ARENA
    TITANIA ARENA: A full, polished, premium titanium max metal bike for ceramic vs titanium beginners, with an attractive titanium plate flat irons chrome titanium i phone case finish, it features a high-performance titanium dive knife

    ReplyDelete